आता जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडणार ; संभाव्य तारखा काय?

डिसेंबर 23, 2025 9:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून यानंतर आता जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखेबाबत मोठी अपडेट समोर आली असून या निवडणुका आठवडाभरात जाहीर होतील असा अंदाज महायुतीमधील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वर्तविला आहे. त्यामुळे झेडपीच्या निवडणुका याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

loksabha election jpg webp

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आरक्षणाच्या पेचामुळे दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.

दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? याबाबतचा संभ्रम कायम आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका महिनाअखेरला जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

जळगावसह रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या चार ते आठ दिवसांत लागतील असा दावा महायुतीमधील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलाय.

जिल्हा परिषदेच्या संभाव्य तारखा काय ?
राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी डिसेंबरच्या अखेरीस आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस अथवा सोमवारी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर २ दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. २८ ते २९ जानेवारी रोजी मतदान अन् निकाल जाहीर होऊ शकतात. ३१ जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories