जळगाव जिल्ह्यात कोरडे दिवस जाहीर; दारूची दुकाने राहणार बंद! तारीख घ्या जाणून

जून 13, 2026 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या १७ जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जळगाव जिल्ह्यात कोरडे दिवस जाहीर करण्यात आले आहेत.

dry day

निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दि. १८ जून २०२६ (गुरुवार) रोजी होणार असून मतमोजणी दि. २२ जून २०२६ (सोमवार) रोजी होणार आहे. यानिमित्त लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ च्या कलम १४२ (१) अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आदेश जारी केले आहेत.

जारी आदेशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दि. १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर मद्यविक्रीस बंदी लागू राहील. दि. १७ जून रोजी संपूर्ण दिवस, दि. १८ जून रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत तसेच दि. २२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोरडा दिवस लागू राहणार आहे.

या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले असल्याचे राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक डॉ. व्हि.टी. भूकन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now