जळगाव लाईव्ह न्यूज । सावकारी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळातील सहकारी संस्था कार्यालयातील दोन प्रमाणित लेखा परीक्षक जळगाव एसीबीने रंगेहात पडकले आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वर्ग-३ चा सहकार अधिकारी मात्र एसीबीचा सुगावा लागताच पसार झाला आहे. पसार अधिकाऱ्याला तब्बल १ लाख रुपये वेतन आहे.

सहकार विभागाचे प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते (वय ६२, राजस्थान मार्बलमागे, भुसावळ) व प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे (४०, विवेकानंद नगर, जिल्हापेठ जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. तर वर्ग तीनचा सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड हा पसार झाला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
भुसावळ येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी नवीन परवाना हवा होता. त्यासाठी त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात रीतसर लेखी अर्ज केला होता. हा परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात कार्यालयातील सहकार अधिकारी गरुड याने तक्रारदाराकडे २०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली, तसेच खाजगी ऑडिटर सुरेश विसपुते याला भेटण्यास सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २३ एप्रिल २०२६ रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. या दरम्यान खाजगी ऑडिटर सुरेश विसपुते याने सहकार अधिकारी विजय गरुड याच्यासाठी, स्वतःसाठी आणि दुसरा खाजगी ऑडिटर हेमंत काळे या तिघांच्या वाट्याचे मिळून एकूण ३०,००० रुपयांची लाच मागितली.
काल दिनांक १५ जून रोजी एसीबीच्या पथकाने भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी सुरेश विसपुते याने तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारले. रक्कम घेण्यापूर्वी विसपुते याने दुसरा आरोपी हेमंत काळे याच्याशी फोनवरून तक्रारदाराचे बोलणे करून दिले. हेमंत काळे याने फोनवरून लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. आरोपी सुरेश विसपुते याने त्यातील ५ हजार रुपये सहकार अधिकारी विजय गरुड याच्या सांगण्यावरून त्याला ‘फोन पे’ (PhonePe) द्वारे ऑनलाईन पाठवले. हा व्यवहार पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने विसपुते आणि काळे या दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. मात्र, याच दरम्यान कारवाईची कुणकुण लागल्याने सहकार अधिकारी विजय गरुड हा घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरला.
या कारवाईत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही प्रमाणित लेखापरीक्षक हे मानधनावर (खाजगी इसम) काम करत होते. मात्र, ज्याच्यासाठी ही लाच घेतली जात होती, तो वर्ग-३ चा सहकार अधिकारी विजय गरुड याला शासनाकडून तब्बल १ लाख रुपये महिना वेतन आहे. तरीही अवघ्या ५ हजार रुपयांच्या लाचेसाठी त्याने आपले पद पणाला लावले आणि कारवाईची कुणकुण लागताच तो पसार झाला.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार अधिकारी विजय गरुड याचा पोलीस शोध घेत आहेत.










