⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

क्षयरोग जनजागृतीत न्हावी उपकेंद्राने मारली तालुक्यात बाजी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । आरोग्य विभागाने क्षयरोगाबाबत यावल तालुक्यात महिनाभर जनजागृती अभियान राबवले. त्यात ग्रामीण व शहरी भागात उत्कृष्ठ पद्धतीने जनजागृती करणारे आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्रथम बक्षीस न्हावी उपकेंद्राने पटकावले. गुरुवारी एका कार्यक्रमात या पथकाचा गौरव करण्यात आला.

आरोग्य विभागाने तालुक्यातील यावल व फैजपूर शहरांसह ८८ गावात क्षयरोग जनजागृती अभियान राबवले. त्यात क्षयरोगाची लक्षणे, उपचार पद्धती, शासनाचे अर्थसाहाय्य, रुग्णांबाबत पाळली जाणारी गोपनीयता ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. मात्र, हे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी जनजागृती करणाऱ्या पथकांची स्पर्धा घेतली. त्यात न्हावी उपकेंद्राने पहिले बक्षिस पटकावले. गुरुवारी येथील तालुका आरोग्य विभागाने त्यांचा सन्मान केला.

यांचे सहकार्य

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, तर पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी सरवर तडवी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जी.एम.रिंधे, आरोग्य विस्तार अधिकारी डी.सी.पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल रावते प्रमुख पाहुणे होते. यावेळी द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देखील देण्यात आली. क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, मिलिंद राणे, अश्विनी जाधव, शकील तडवी, मिलिंद जंजाळे, संतोष भंगाळे, फत्तू तडवी, सुहास कुलकर्णी, अशोक तायडे यांनी सहकार्य केले. आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

यांनी पटकावले बक्षीस

जनजागृती स्पर्धेत प्रथम क्रमांक न्हावी आरोग्य उपकेंद्राच्या पथकास क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल रावते यांच्याकडून २१०१ व प्रमाणपत्र, द्वितीय बक्षीस भालोद उपकेंद्रास ७०१ रूपये, तृतीय बक्षीस पाडळसा उपकेंद्रास ५०१ रूपये व आणि उत्तेजनार्थ बक्षीस राजोरा आरोग्य उपकेंद्रास २०१ रूपये व प्रमाणपत्र असे मिळाले.