जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यात दररोज कुठं ना कुठं अपघात होतानाच्या बातम्या समोर येत आहे. याच दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ भीषण ट्रक आणि आयशर गाडीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आयशर चालक जागीच ठार झाला आहे. समाधान मेघराज पाटील असं मयत चालकाचं नाव आहे. तर ट्रक मधील चार गंभीर जखमी झाले असल्याचे समजले आहे.

ही घटना आज दि. 4 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यादरम्यान जळगावकडून चाळीसगावकडे येत असलेल्या ढेप भरलेला आयशर क्रमांक एम एच 19 सी व्हाय 0704 या गाडीची आणि चाळीसगाव कडून जळगाव कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 19 झेड 4758 या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने आयशर चालक समाधान मेघराज पाटील हा जागीच ठार झाला.
तर ट्रक मधील ड्रायव्हर व इतर असे तीन ते चार जखमी आहे. ही घटना घडल्यानंतर झालेल्या जोरदार आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना खबर दिली तसेच अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमला देखील मदतीसाठी बोलविण्यात आले. रेस्क्यू टीमचे व अग्निशमन दलाचे प्रमुख अक्षय घुगे यांचे सह फायर टीमने अडकलेल्या जखमींना शर्तीचे प्रयत्न करून ट्रकचा पत्रा कापून लोकांना सुरक्षित रेस्क्यू केले.
यात, ड्रायव्हर ईश्वर पाटील फायर मॅन संदेश पाटील,चंद्रकांत राजपूत, विशाल मोरे यांचा समावेश होता तर घटनास्थळावर लागलीच पोलीस दाखल झाल्याने या ठिकाणी पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून परिस्थितीवर नियंत्रण आणित पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सार्वे व तांबोळे या गावांवर शोककळा पसरली आहे.