एरंडोलमधील ३ कुख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून तडीपार

सप्टेंबर 24, 2026 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एरंडोल शहर व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीविरुद्ध जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई करत तिघांना एक वर्षासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले.

erndolcrime

हद्दपारीच्या कारवाईत टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (वय १८, रा. नागोबा मढी, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (वय १९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ ‘झिंग्या’ दत्तात्रय पाटील (वय २५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली असून, हद्दपारीचे आदेश बजावल्यापासून अवघ्या दोन दिवसांत जिल्ह्याची हद्दी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

२०२६ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करणे आणि मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३८/२०२६ दाखल करण्यात आला. याशिवाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. संबंधित टोळीच्या कारवायांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे नमूद करत पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावासोबत सादर करण्यात आलेली कागदपत्रे, दाखल गुन्हे आणि संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांची तपासणी करण्यात आली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तिघांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जारी केला.एरंडोल शहर व परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कठोर कारवाई केली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now