
जळगाव लाईव्ह न्यूज । गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुक्ताईनगर येथील सरफराज सय्यद याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने मुक्ताईनगरसह वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी मुक्ताईनगर येथील काझीपुरा परिसरात राहणाऱ्या सरफराज सकिर सय्यद याला इन्स्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने तयार केलेल्या बनावट खात्यावरून संपर्क करण्यात आला. मेसेज आणि फोनद्वारे त्याला वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले. या संपर्कावर विश्वास ठेवून सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. मात्र, तेथे त्याची वाट पाहत असलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सरफराजला लक्ष्य केले. सुरुवातीला लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर सलग दोन वार करण्यात आले. त्यानंतर पायावरही जोरदार हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सरफराज खाली कोसळल्यानंतर एका हल्लेखोराने गावठी कट्टा बाहेर काढत त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सरफराजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हल्ला
घटनेनंतर वरणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७), दोघेही रा. फेकरी, ता. भुसावळ, यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात जुन्या वादातून बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे समोर आले होते. सोशल मीडियावरील बनावट खात्याचा वापर करून सरफराजला घटनास्थळी बोलावण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले.
मृत्यूशी झुंज अपयशी; कुटुंबाचा आधार हरपला
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरफराजला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. सरफराज हा घरातील कर्ता पुरुष होता. त्यामुळे त्याच्या निधनाने कुटुंबाचा मोठा आधार हरपला असून, नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने मुक्ताईनगरसह वरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.





