
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा ग्रामीण पोलिसांनी एका धाडसी कारवाईत बेकायदा शस्त्रे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील तिघा संशयितांना जेरबंद केले आहे. लासूर गावाच्या पुढे असलेल्या नाटेश्वर मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साहील दगडू आवारे (वय १९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पिंपरी-चिंचवड), सौरभ संतुराम मोतीरावे (वय २३, रा. पिंपरी-चिंचवड) आणि रोहित चंद्रकांत जुजगर (वय ३०, रा. चिखली, जि. पुणे) असं अटक केलेल्या तिघांचे नाव असून त्यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही संशयित आरोपी मोटारसायकलवरून गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची बेकायदा वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जात आहेत. या माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलिसांनी नाटेश्वर मंदिराजवळ सापळा रचून ती वाहने व व्यक्तींची तपासणी केली असता, त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या तीन गावठी कट्ट्यांची किंमत प्रत्येकी २५ हजार रुपये असून त्यांची एकूण किंमत ७५ हजार रुपये आहे. आठ जिवंत काडतुसांची किंमत ८ हजार रुपये, तर मोटारसायकलची किंमत ५० हजार रुपये आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





