पाळधी साईबाबा मंदिरात तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’

डिसेंबर 23, 2022 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे दरवर्षी प्रमाणे आयोजित ‘ब्रह्मोत्सव’ यावर्षी दि.२४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे यंदा २० वे वर्ष असून या धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

SAIMANDIR

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा २० वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. समारोहनिमित्त यंदा देखील तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन करण्यात आले असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे. महोत्सवात तीन दिवस नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी हे मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजाअर्चा करणार आहेत.

शनिवार दि.२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रयाग गौरव रत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे हे सुंदरकांड सादर करणार असून यात हनुमानाच्या भक्तीचे वर्णन आहे. हनुमानाची भगवान श्रीरामांप्रति असलेल्या आस्थेचे वर्णन संगीतमय सुंदरकांड द्वारा पंडित दुबे हे सादर करणार आहे. दि.२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून बॉलिवूडचे प्लेबॅक सिंगर श्रीमती कविता पौडवाल या ‘एक शाम साई के नाम’ भजन संध्या सादर करणार आहेत. साईबाबांच्या जीवन कार्याचे वर्णन करणारे अप्रतिम आणि दुर्मीळ भजन कविता पौडवाल सादर करतील.

विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन
सोमवार दि.२६ रोजी श्री साईबाबा, परमभक्त हनुमान, गायल माताजी यांचा सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार असून दुपारी ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी तीनही दिवस मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन भक्तिरसात न्हाऊन निघावे, असे आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, मधुकर झंवर, रामचंद्र झंवर, किरण झंवर, प्रवीण झंवर, सुरज (लाला) झंवर, चंद्रकांत इंदाणी, राजेंद्र इंदाणी, शरदचंद्र कासट, नितीन लढा, मनीष झंवर, राजेश दोशी, राजेश तोतला, दीपक ठक्कर, विपुल सुरतवाला, शैलेश काबरा, हितेंद्र (पप्पू) चौधरी, नरेश दोशी, सतिष अग्रवाल, कैलास मालू आदींनी केले आहे.

मंदिर, ब्रह्मोत्सव उत्सवाचे उपक्रम
श्री साईबाबा मंदिर आणि ब्रह्मोत्सवतर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले आणि चालविले जातात. त्यात साई मंगल कार्यालय, द्वारकामाई हॉल (साई भक्त निवास), पूरग्रस्तांना धान्य वाटप, पाणी अडवा, पाणी जिरवा अंतर्गत नाले खोदकाम, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांची मदत, साई जन-औषधी केंद्र, पुणे, दिवाळी दीपोत्सव, दसरा रावण दहन, गोपाल जन्मोत्सव, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, ९०० भाकड गाईंची श्री साई गौशाळा, धर्मार्थ दवाखाना यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now