⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

उपमहापौरांच्या प्रभागाचे पहिल्या पावसातच तीन तेरा : नागरिकांनी थेट आयुक्तांना दिली तक्रार

जळगाव लाईव्ह न्युज | १२ जून २०२२ | जळगाव शहरात आज सर्वांना सुखदायी असणारा पहिला पाऊस झाला. मात्र या पावसामुळे संपूर्ण शहराच्या रस्त्यांचे पुन्हा एकदा तीन तेरा वाजले. या सर्व घडामोडी मध्ये सर्वात हीन बाब म्हणजे खुद्द उपमहापौरांच्या प्रभागातच पहिल्याच पावसाने धुमाकूळ घालत परिसरातील नागरिकांचे हाल केले. गेल्या वर्षभरापासून परिसरातील गटारीचे काम पूर्ण न केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अशी तक्रार नागरिकांनी थेट आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली. यामुळे जर उपमहापौरांच्या प्रभागात अशाप्रकारे नागरिकांना त्रास होणार असेल तर इतर वॉर्डात कशाप्रकारे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल किंवा कोणत्या गोष्टीला किंबहुना समस्येला सामोरे जावे लागू शकते याबद्दल विचार न केलेलाच बरा.

प्रभाग क्रमांक दहा मध्ये संत मीराबाई नगर, पिंपळा येथील गटारिंचा निचरा गेल्या वर्षभरापासून करण्यात आला नाहीये. ह्यामुळे पहिल्याच पावसामध्ये संत मीराबाई नगरातील गटारी तुडुंब भरलेले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या नागरिकांना ओढवते यामुळे. ताई तुम्ही स्वतःहून आमच्या प्रभागाची पाहणी करा. अशी विनंती स्थानिक नागरिकांनी आयुक्त विद्या गायकवाड यांना ई-मेल द्वारे केली आहे.

WhatsApp Image 2022 06 12 at 5.54.10 PM
उपमहापौरांच्या प्रभागाचे पहिल्या पावसातच तीन तेरा : नागरिकांनी थेट आयुक्तांना दिली तक्रार 1

प्रभाग क्रमांक 10 यामध्ये झालेल्या विकासकामांचे उद्घाटन स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्या वेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मोठ्या उत्साहात गुलाबराव पाटील यांना पूर्ण प्रभागात फिरवून प्रभागाची माहिती दिली होती. मात्र याच प्रभागात असलेल्या संत मिराबाई नगर या परिसरातील नागरिकांचे होणारे हाल उपमहापौर कुलभूषण पाटील यांना दिसत नाहीयेत. प्रभागातील या परिसरामध्ये असलेल्या गटारींची कामे वर्षानु वर्ष पूर्ण झाले नाहीयेत. उपमहापौर कुलभूषण पाटील यांना नागरिकांनी कित्येकदा विनंती करूनही या नागरिकांकडे कुलभूषण पाटील यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी ‘जळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले.

जळगाव लाईव्हशी बोलताना स्थानिक नागरिक प्रदीप पाटील म्हणाले कि, उपमहापौर कुलभूषण पाटील सोडल्यास आमच्या प्रभागात कोणीही ढुंकून पाहत नाहीत. इतर ३ नगरसेवक कोण ? हे आम्हाला माहित नाही.यामुळे त्याच्याकडून अपेक्षा होती मात्र त्यांच्याकडून केवळ आश्वासनच मिळाली. काम काही पूर्ण झाले नाही.