जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरी, घरफोडीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. यातच मामाकडे कुटुंबासह गेलेल्या तरुणाचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी मंगळवारी तरुणाच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गिरणा पंपिंग रस्त्यावरच्या राम नगर येथे ऋषीकेश येवले हा तरुण आई-वडील, बहिणीसह वास्तव्यास आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता ऋषीकेश हा कुटुंबासह भडगावातील मामाच्या घरी गेला होता. बंद घर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात डल्ला मारत सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरून नेला. येवले कुटुंब घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. घरात प्रवेश केल्यानंतर साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील १५ ग्रॅमचे मंगळसूत्र व प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी ऋषीकेश येवले यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रामनगर परिसरात आणखी एका घरात चोरीचा प्रयत्न
ऋषीकेश येवले यास त्यांच्या शेजारी राहणारे संजय साळुंखे यांनी रामनगर परिसरातील संजय चौधरी यांचे घर सुध्दा चोरट्यांनी फोडल्याची माहिती दिली; पण घरात चोरट्यांना काहीही मिळून आले नाही. घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली; मात्र चोरट्यांचा सुगावा मिळेल असे काहीही मिळून आलेले नाही. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.











