⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

…तर तरुणीचा जीव वाचला असता

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । यावल तालुक्याला लागून असलेल्या सातपुडाच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या या गावातील एका आदीवासी तरुणीचा विषारी सापाने दंश केल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. मात्र, मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णवाहिका मिळत नसल्याने एका खाजगी वाहनाने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. आमदार शिरीष चौधरी यांनी रुग्णालयाला भेट देत मयत तरुणीच्या कुंटुबाचे सांत्वन केले.

अधिक माहिती अशी की, गाडऱ्या गावातील अविवाहीत आदीवासी तरूणी फुगली भाया बारेला (वय २३) हिचा शेतात काम करीत असताना अचानक तिला विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. या ठिकाणी जर तिला तात्काळ सर्पदंश प्रतिबंधक लस मिळाली असती तर कदाचीत ती वाचली असती अशी खंत गावऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांच्याशी आदीवासी बांधवांनी गंभीर स्वरूपाच्या रूग्णासाठी रुग्णवाहीका मिळत नसल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याचे सांगितले. तसेच ज्या मानसेवी आरोग्य अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. ते या गावात व परिसरात कधी ही दिसून येत नसल्याच्या तक्रारी व आरोग्य बाबतच्या समस्या व अडचणींचा पाढाच यावेळी आदीवासी बांधवांनी वाचला. याची दखल घेत आमदार शिरीष चौधरी यांनी लागलीच मोबाइलव्दारे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्याकडे या आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी असल्याचे नमुद करून याविषयी आपण लक्ष घालण्यासंदर्भात चर्चा केली.

तसेच अशाप्रकारे जर नियुक्तीच्या ठिकाणी जर कुणी जात नसेल तर त्यांच्या कारवाही करणे गरजेचे आहे अशा सुचना त्यांनी आधिकाऱ्यांना दिल्यात. तर कृषी विज्ञान केंद्र प्रमुखांशी बोलणी करून एक रुग्णवाहीकाही उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी चर्चा केली. अशा अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या गावांसाठी प्रसंगी स्वतंत्र रुग्णवाहीका असावी यासाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अशा सुचना दिल्या. या प्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील, गाडऱ्या-जामन्या गावाचे सरपंच भरत छतरसिंग बारेला व ग्रामसेवक रूबाब तडवी, वढोदे गावाच्या सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे नानासाहेब घोडके व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.