
भडगाव : पाचोरा तालुक्यातील कजगाव परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी भडगाव पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून कामावर जात असलेल्या जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २३, रा. कजगाव) या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गोळीबार करणारा संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कजगाव-पारोळा रोडवरील सोलर प्लांटजवळ ही घटना घडली. मन्या उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याने जुन्या वादातून कामावर जात असलेल्या जयेश पवार याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात गोळी लागल्याने जयेश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी जखमी तरुणाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मन्या उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत. संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. गोळीबारामागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी पोलीस तपासातून समोर येणार आहेत.



