
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, तरसोद बायपास ते आसोदा फाट्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष रामदास सोनवणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील दुसखेडा येथे नातीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून संतोष सोनवणे हे एका नातेवाइकासोबत दुचाकीने जळगावकडे परतत होते. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तरसोद बायपास ते आसोदा फाट्यादरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील संतोष सोनवणे हे रस्त्यावर कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.
चार महिन्यांत १४ जणांचा बळी; महामार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या महामार्गावर गेल्या चार महिन्यांत तब्बल १४ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, महामार्गावरील वाहतूक शहरातून वळवण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या अपघाताला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नातेवाइकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.





