कमळाला चिखलात लोटून शिवधनुष्य पेलायला निघालेल्या उपमहापौरांचा टेकूच निखळला

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । कोणत्याही महानगरपालिकेच्या इतिहासात क्वचितच असे होते की पहिल्यांदा निवडून आलेला एखादा नगरसेवक त्या महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर जाऊन बसतो. जळगाव शहर महानगरपालिकामध्ये अशीच कामगिरी कुलभुषण पाटील यांनी करून दाखवली. उपमहापौर पद मिळण्यापूर्वी त्यांच्या आजूबाजूला नगरसेवकांचा घोळका होता, नवग्रहांच्या बळावर त्यांनी आपले वजन दाखविले आणि उपमहापौर पदाची माळ गळ्यात पाडून घेतली. तरुण चेहरा उपमहापौर झाल्याने शहराचा विकास होईल असा अंदाज होता मात्र आता हेच उपमहापौर साहेब सध्या एकटे पडल्याचे दिसत आहे. मनपाचा सतराव्या मजल्याची ‘बी’ विंग सध्या रिकामीच असते आणि सर्व मंडळी ‘ए’ विंगमध्ये बसलेले असतात.

जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये अभूतपूर्व सत्तांतर झालं ते केवळ आणि केवळ कुलभूषण पाटील यांनी केलेल्या बंडामुळे. भाजपची सत्ता उलथवून टाकल्याने कुलभूषण पाटील यांना उपमहापौर पद देखील मिळाले. त्यांच्याहून वरिष्ठ असलेले कित्येक नगरसेवक भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत आले आणि त्यांनी कुलभूषण पाटील यांना आपला नेता बनवले. बघता बघता गेल्या निवडणुकीत पराभूत झालेला हा तरुण भाजपात आला काय आणि शिवसेनेकडून उपमहापौर झाला काय? म्हणत अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विकासाचा वायदा करून देखील वर्षभरात जळगाव शहरात विकास झाला नसल्याने भारतीय जनता पक्ष जळगावकरांच्या मनातून त्यावेळी उतरला होता त्यात शिवसेनेने सत्ता मिळवल्याने आता शिवसेनाच जळगाव शहराचा कायापालट करणार अशी घोषणा करण्यात आली. भारतीय जनता पक्षात नगरसेवकांना निधी मिळत नाही म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवग्रह मंडळींचा एक गट फुटला आणि शिवसेनेला येऊन मिळाला. मोठ्या घोडेबाजारात महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. सत्ता स्थापन झाली आणि निधी यायला देखील सुरुवात झाली. पालकमंत्र्यांनी लक्ष घातले, महापौर, मूळ सेनेच्या काही सदस्यांनी लक्ष घातले. वर्ष उलटूनही निधी काही मिळत नाहीये आणि आलाच तर ठराविक प्रभागात जातोय हे काही बंडखोर नगरसेवकांना समजलं आणि ते नगरसेवक पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेले.

नवग्रहांच्या मांदियाळीतील उरलेल्या नगरसेवकांपैकी सर्वांनाच वाटत होतं की, आम्हाला तरी कुलभूषण पाटील आमच्या प्रभागात विकासकामे करून देण्यासाठी निधी देतील. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. कुलभूषण पाटील यांचा प्रभाग सोडल्यास बहुतांश निधी हा केवळ आणि केवळ शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळाला. ४२ कोटी पैकी बहुसंख्य काम हे केवळ आणि केवळ प्रभाग क्रमांक पाचमध्ये करण्यात आली. प्रभाग ५ शहराच्या मुख्य बाजारपेठेचा आणि महत्वाचा प्रभाग असल्याने कामे आवश्यक असली तरी दुसरीकडे त्यावेळी देखील बंडखोरांपैकी काहींनी याला विरोध दर्शवला आणि सर्व कामेही शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात होतात असा आरोप केला. मुळात प्रभाग लक्षात न घेता हा विरोध शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनाच केला जात असल्याचे दिसून आले.

मागणी आणि आरोपांकडे कोणीही लक्ष दिले नाही. बंडखोरांना बोलता येत नाही, बोलू द्या अशा अविर्भावात कित्येक सदस्य होते. जळगाव शहराचा विकास व्हायचा असेल तर तो समानच व्हायला हवा असा आग्रह बंडखोरांचा होता. मात्र त्यांना निधी मिळाला नाही बंडखोरांनी कित्येक वेळा खुली नाराजी दाखवूनही बंडखोरांना स्वतःच्या प्रभागांमध्ये विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला नाही.

नाराजी बोलून दाखविणाऱ्यांना निधी मिळत नसला तरी स्वतःच्या प्रभागांमध्ये मात्र उपमहापौर विकास करत होते, भूमिपूजन करून घेत होते. सर्व प्रकार बंडखोरांच्या लक्षात आला आणि त्यांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली आणि स्वतःच्या प्रभागासाठी थोडा का होईना पण निधी उपलब्ध करून घेतला. आता या सगळ्यांमध्ये बंडखोरांसाठी विलन ठरले ते कुलभूषण पाटील. कारण त्यांच्या सांगण्यावरूनच बंडखोर शिवसेनेत आले होते मात्र त्यांच्या प्रभागाचा विकास काही झालाच नाही. दुसरीकडे कुलभूषण पाटील यांनी कळत-नकळत काही सदस्यांची नाराजी ओढवून घेतली. ‘जे पक्षाला झाले नाही ते आपल्याला काय होणार?’ हे कुलभूषण पाटील विसरले. बंडखोर नगरसेवकांमध्ये आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यामध्ये हळूहळू मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे. अनेकांनी आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या. गेल्या साडे तीन महिन्यापासून कुलभूषण पाटील यांच्या दालनात एक-दोन बंडखोर नगरसेवक सोडल्यास कोणीही शक्यतो जात नाही. ज्या कुलभूषण पाटील यांच्या अवतीभोवती नगरसेवकांचा गराडा असायचा आता ते चित्र पालटले आहे. ‘कमळाला चिखलात लोटून शिवधनुष्य पेलायला निघालेल्या उपमहापौरांचा टेकूच आज निखळला’ अशी प्रतिक्रिया संपूर्ण महानगरपालिकेमधून येत आहे.