⁠ 
रविवार, मे 5, 2024

जीएमसीत औषधींचा साठा दोन दिवसात संपला, रुग्णांची हाेतेय गैरसाेय

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । “शावैम” व रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना औषध भांडारगृहाकडून प्राप्त यादीनुसार उपलब्ध औषधीच डॉक्टरांनी लिहून द्याव्या, असे पत्र अधिष्ठातांनी सोमवारी काढले; मात्र प्राप्त यादीतील औषधी आठवडाभराच्या आतच संपत असल्याने पुन्हा औषध वितरण विभागामध्ये रुग्ण हुज्जत घालताना दिसून येत आहे. त्यातच सात दिवस पुरेल इतक्याच औषधी रुग्णांना देण्याचे आदेश काढल्याने नियमित औषधी लागणाऱ्या रुग्णांना महिन्यातून दोनदा चकरा माराव्या लागणार आहे.

जिल्ह्याभरातील तीनशेहून अधिक रुग्ण दररोज जीएमसीत तपासणीसाठी येत असतात. रुग्णांना तपासणी केल्यानंतर डॉक्टर ‘ज्या’ औषधी रुग्णांना लिहून देतात त्यापैकी बऱ्याच औषधी औषध वितरण विभागात उपलब्ध नसल्याने रुग्ण वितरण विभागात वाद घालत असतात. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दर सोमवारी औषध भांडारगृहाकडून दर सोमवारी प्राप्त झालेल्या यादीनुसार उपलब्ध असणारीच औषधी रुग्णांना लिहून द्यावी, असे आदेश काढले; मात्र शुक्रवारी काही रुग्णांना डॉक्टरांनी प्राप्त यादीतील औषधीच लिहून दिली. मात्र, औषध वितरण विभागाकडून या औषधांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमक्या कोणत्या औषधी रुग्णांना लिहून द्यायच्या? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

आठवड्याभरातच औषधी मिळणार

पूर्वी रुग्णांची परिस्थिती पाहून त्याला पंधरा किंवा एक महिन्याच्या औषधी दिल्या जात होत्या; मात्र अनेक रुग्ण औषधी वाया घालवत असल्याने सात दिवस पुरेल इतक्याच औषधी रुग्णांना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक आजारावरील औषधी व हृदयरोगाशी संबंधित औषधी या १५ दिवस पुरतील इतक्याच देण्यात येणार आहे. त्यामुळे आता रुग्णांना महिन्यातून दोन वेळेस तपासणीसाठी यावे लागणार आहे.

औषधीच्या ब्रँडचा उल्लेख नको

डॉक्टरांनी औषधी लिहून देताना त्यावर कोणत्याही ब्रँडचा उल्लेख नको त्या जेनरिक नावानेच देण्यात याव्या, असे आदेश देखील दिले आहे. मात्र, तरी देखील अजूनही डॉक्टर हे ब्रँडच्या नावानेच औषधी लिहून देत असल्याचे समोर आले आहे.