⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑगस्ट २०२३ | शासकीय कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार हा नवा नाही. सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच अनुभव येतो. मात्र सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर ते आज तुम्हाला ते कळेल! कारण, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या डिलींगचे रेकॉर्डींग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वांना ऐकवले.

शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन डीपीडीसीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे यांनीच सरकारी यंत्रणेचे वाभाडे काढले. जिल्ह्यात सर्वच शासकीय विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या अधिकाऱ्यांपर्यंत कशी लाचखोरी चालते, याची माहितीही या लोकप्रतिनीधींनी दिली.

आमदार चव्हाणांनी तर थेट एका कंत्राटदाराला फोन लावून सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली, ते सभागृहात सादर केले. लाचेसाठी फाईली कशा अडविल्या जातात, मला एकही शासकीय विभाग असा दाखवा, ज्यात एकही फाईल पेंडीग नाही. वीज कंपनीत सव्वा लाखाचे कंत्राट घेणाऱ्याला वीस लाख संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांना द्यावे लागत असतील आणि वरिष्ठ अधिकारी पाच लाख मागत असतील, तर कंत्राटदार आत्महत्या नाही, तर काय करेल? असा संताप त्यांनी व्यक्त केला.

आमदार किशोर पाटील म्हणाले, माझ्या मतदार संघात सहा लाखांत अतिशय चांगली अंगणवाडी तयार करण्यात येत आहे. निधी मंजूर आहे. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी मंजूरी देत नाहीत. दु:ख कोणाला सांगावे? आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, एमएसईबीतील अधिकारी कंत्राटी कामगांराकडून तीस-तीस हजारांची मागणी करतात. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.