सावधान : जळगाव शहरातील या प्रतिष्ठीत भागात आढळले डेंग्यूचे रूग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ सप्टेंबर २०२३ | पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा सर्वात धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो. यामध्ये रुग्णाला डोकेदुखी, तीव्र तापासोबत स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होतो. यासोबतच डेंग्यूच्या तापामुळे शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. जर प्लेटलेटची संख्या जास्तच कमी झाली की, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. जळगाव शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जवळपास १२३ जणांना डेंग्यूची बाधा झालेली आढळून आलेली आहे.

शहरातील प्रतिष्ठीत लोकांचा रहिवास असलेल्या अयोध्यानगरातही आता तब्बल १५ रूग्ण आढळून आल्याची माहिती नगरसेवक विरेन खडके यांनी दिली. अयोध्यानगर परिसरातील सदुगूरूनगर, शांती निकेतन हाऊसिंग सोसायटी, श्रीकृष्णनगर, गोपाळपुरा, यमुनानगर, चिमुकले बालाजी मंदिर, हॉटेल गौरवचा मागील परिसर, पोल फॅक्टरी आदी परिसरात महापालिकेतर्फे धूर फवारणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या भागात डासांसा प्रादूर्भाव जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यात आता डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण परिसरात भीती वातावरण पसरले आहे.

महापालिका प्रशासनातर्फे रोज अबेटिंग, पाण्यात टाकण्याचे औषध, जंतुनाशक फवारणी आणि डेंग्यू पॉझिटिव्ह असलेल्या परिसरात धूर फवारणी (फॉगिंग) आदी उपाय केले जात आहेत. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी कोरडा दिवस पाळावा, पाणी साठवून ठेऊ नये, घरात कुलर जाळ्या काढून टाकाव्यात, गच्चीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, टायर, कुंड्या यात पाणी साचू देऊ नये असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

डेंग्यू तापाची लक्षणे
डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणं दिसू शकतात. दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे अर्थात DHFमुळे तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा, अशी लक्षणं दिसू शकतात. अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असते.

अशी घ्या काळजी
डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे विशेष लक्ष ठेवा. तिथे खूप दिवस पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्या. घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळणं सर्वांत महत्त्वाचं. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावच. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणे आवश्यक आहे.