उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मिळेल दिलासा, जिल्ह्यात पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । मे महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावसह राज्यातील किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४२ अंशपेक्षा जास्त असल्याने सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर चांगलेच हैराण झाले. दरम्यान, एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे जिल्ह्यात सोमवारपासून (६ मे) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे अंदाज?
जिल्ह्यात ६ आणि ९ मे या दिवशी विविध ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेची कमाल गती ताशी १३ ते ३५ किमी प्रतितास राहील. दरम्यान, काल शनिवारी जळगावचा पारा ४२.३ अंशावर होता सायंकाळपर्यंत उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहे.
दुपारी चार वाजेच्या सुमारास तापमान ४२.४ अंशांवर होते. आज रविवारी तापमानात काही अंशी घट येणार आहे. यानंतर सोमवारी तुरळक पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पुढील आठवड्यात सुद्धा कमाल तापमानातील चढ-उतार सुरू राहणार आहे
महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तापमान?
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवारी अकोल्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अमरावती ४३.८, बुलढाणा ४०.०, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यालाही उन्हाच्या चांगल्याच झळा बसल्या. शनिवारी परभणीत ४३.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६, बीडमध्ये ४३.१ अंश तापमान होते. तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४३.४, सांगली ४१.६, सातारा ४०.९, जळगावात ४२.३ आणि मालेगावात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.