⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

डोळे आल्यानंतर अशी घ्या काळजी..!!

जळगाव लाईव्ह न्यूज |25 जुलै 2023| डोळे (नेत्र) हा आपल्या शरिराचा एक महत्वाचा भाग आहे. ज्यामुळे आपण हे सुंदर अप्रतिम विश्व बघून अनुभव घेऊ शकतो. अशा या डोळ्यांस काही रोग जडल्यास लगेच त्यावर उपचार करावे. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह हा डोळ्यांच्या संसर्गापैकी एक आहे. नेत्राभिष्यंद म्हणजे नेत्र अधिक अभिष्यंद (दाह). डोळ्यांच्या ठिकाणी होणारा दाह त्यालाच नेत्राभिष्यंद म्हणतात.

एका व्हायरसद्वारे त्याचा संसर्ग होतो. हा रोग जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य संसर्ग असल्याने त्याची तशीच लक्षणे दिसतात. जसे, सामान्यत: एका डोळ्याला संसर्ग होतो आणि काही दिवसानंतर किंवा काही तासातच दुसर्‍या डोळ्यालाही संसर्ग होतो. डोळ्याच्या बुबुळाच्या पुढील भागाचा विशेष दाह यात असतो. डोळ्याला झाकणारा पडदा (conjunctiva), ज्यात रक्‍तवाहिन्या असतात. त्या फुगतात त्यामुळे डोळ्याला गुलाबी किंवा लालसर रंग येतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे..

  • व्हायरस (विषाणू) – व्हायरल इन्फेक्शन श्वसन संक्रमण जसे सर्दी, घसा खवखवणे
  • अ‍ॅलर्जी
  • अशुद्ध कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे.
  • रसायने डोळ्यात जाणे
  • डोळ्यात एखादे किटाणू जाणे
  • नवजात बालकास (जन्म होतांना आईच्या पोटातच बाळाच्या नेत्रामध्ये काही घाण गेल्यास)

लक्षणे

  • एका किंवा दोन्ही डोळ्यांना खाज सुटणे
  • एका किंवा दोन्ही डोळ्यांस लालसरपणा
  • एका किंवा दोन्ही डोळ्यातून रात्रभर स्त्राव येणे, परिणामी पापण्या चिकटणे, सकाळी डोळे उघडण्यास त्रास होणे
  • एका किंवा दोन्ही डोळ्यात टोचल्याप्रमाणे अथवा आवळल्याप्रमाणे वेदना होणे
  • डोळ्यात वाळू/रेतीचे कण असल्याप्रमाणे वेदना होणे
  • डोळ्यातून अश्रू गळणे

प्रथमदर्शनी डोळ्यांची निगा कशी राखावी

  • प्रभावित डोळ्याला स्पर्श करणे किंवा चोळणे टाळावे.
  • स्वच्छ कपडा, टॉवेल, टिश्यू, कापूस यापैकी एकाने डोळे स्वच्छ पुसावे.
  • सकाळी अथवा दिवसा डोळे चिकटल्यास स्वच्छ कापड/ कापूस/टिश्यू/ टॉवेल घेऊन गरम पाणी किंवा सलाईन वॉटर किंवा थंड पाण्यात बुडवून डोळे स्वच्छ पुसून घ्यावे.
  • आयुर्वेदानुसार त्रिफळा चुर्णाचा काढा करुन गाळून घेऊन त्या काढ्याने डोळे स्वच्छ करावे.
  • त्रिफळा किंवा ज्येष्ठमध आणि दारुहरिद्रा याचा लेप डोळ्याच्या आजूबाजूने लावणे, सुकल्यावर डोळे धुवून स्वच्छ करणे.
  • डोळ्यांमध्ये जळजळ जास्त असल्यास डोळ्यांभोवती थंड पाण्याची पट्टी, कापूस, टिश्यू, टॉवेल यांपैकी एक घेऊन काही मिनीटे झाकून ठेवावे.
  • आयुर्वेदानुसार आमपाचक वटी 1-1 गोळी दिवसातून 2 वेळा आणि पथ्यादी काढा 10 एमएल दिवसातून तीन वेळा घेणे (वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे.)

निष्कर्ष – साधारण: डोळे आल्याचा प्रभावीपणा 24 ते 48 तासापासून ते 2 आठवड्यापर्यंत जाणवतो. संसर्गाने डोळे गुलाबी होत असल्याने त्यातून आलेला स्त्राव/अश्रू हे थंड वा कोमट पाण्याने स्वच्छ करावे. वापरलेले कपडे, कापूस, टिश्यू हे पुन्हा वापरु नये. वापरावयाचे झाल्यास कापड अथवा टॉवेल हे गरम पाण्याने स्वच्छ धुवून, वाळवून वापरावे. हा विषाणू विरुद्ध डोळ्यात आणि कुटूंबातील इतर सदस्यांमध्ये त्वरेने पसरु शकतो. कुटूंबात पसरत असल्यामुळे त्याला मी सहजच पिंक आय फॅमिली (pink eye family)
असे नामकरण केले आहे.
डोळे आलेल्या व्यक्‍तीने डोळ्यांना लावलेला हात इतरत्र लागणार नाही याची काळजी घ्यावी. हात स्वच्छ साबणाने धुवून टाकावा. कोविड काळात जसे सॅनिटायझर वापरले त्याचप्रमाणे येथेही प्रत्येकी वेळी, वेळोवेळी गरज असल्यास हातासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, जेणेकरुन आजार पसरणार नाही.
डोळयासाठी जर मोठी समस्या निर्माण होत असेल हे वाटत असेल, तीव्र वेदना होत असतील तर त्वरित रुग्णाने डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा.

डोळ्यांची अस्पष्टता, घ्या डॉक्टरांचा सल्‍ला
डोळ्यांचे रक्षण, हेच आयुष्याचे संरक्षण

  • डॉ.हर्षल बोरोले, अधिष्ठाता,
    स्व.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय.
    संपर्क – 94209 40401