चोरट्यांची वाढली मजल, निंभोरा पोस्ट कार्यालयातील तिजोरी लांबवली

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील पोस्ट कार्यालयातील तिजोरीच चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना 5 नोव्हेंबर रात्री 7.30 ते 6 रोजीच्या सकाळी सात वाजेदरम्यान घडली. तिजोरीत एकूण 22 हजार 690 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

निंभोर्‍याचे उपडाकपाल प्रभाकर मिठाराम चौधरी (भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, निंभोरा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात पोस्ट कार्यालय आहे. पोस्टाची रक्कम सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी लोखंडी तिजोरी असून त्यात 22 हजार 689 रुपये किंमतीची रोकड, 980 रुपये किंमतीची पोस्टल ऑर्डर होती व चोरट्यांनी ही संधी साधून पाच हजार रुपये किंमतीची गोदरेज कंपनीची तिजोरीच लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निंभोरा पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पाहणी केली.

तिजोरी लांबविल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार विकास कोल्हे करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून चोरटे चांगलेच सक्रिय झाले असून दिवाळीच्या सुट्टीनिमित्त नागरिक गावाला गेले असल्याचा चोरटे फायदा घेत आहेत. चोरट्यांना लगाम घालणे अद्याप तरी शक्य झालेले नसून नागरिक चोरट्यांना पकडण्याची अपेक्षा करीत आहेत.