⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सावजाच्या मागे धावला बिबट्या, दोघे विहिरीत पडले अन् रात्रभरात जमली गट्टी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने सावजाच्या पाठीमागे लागलेला बिबट्या सावजासह विहिरीत पडल्याची घटना पळसखेडा शिवारात रविवारी मध्यरात्री घडली. पहाटे शेतमालक शेतात आल्यावर त्यास बिबट्या आणि कुत्रा जीवघेणी कसरत करत असल्याचे आढळून आल्यावर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान अजिंठा वनपरिक्षेत्र विभागाला माहिती मिळताच सोयगाव वनविभाग, अजिंठा वन विभाग यांच्या तब्बल पंधरा वनकर्मचाऱ्यांनी पहाटे १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत ४तासांची रेस्कू मोहीम हाती घेवून बिबट्या व कुत्र्याल सुरक्षित विहिरीबाहेर काढले. मात्र, विहिरीबाहेर काढताच कुत्र्याने धूम ठोकली होती. या घटनेत बिबट्याला व कुत्र्याला विहिरीबाहेर पडता न आल्याने त्यांचा तब्बल आठ तासांचा विहिरीत मुक्काम वाढला होता. मात्र, भक्ष म्हणून मागे लागलेल्या बिबट्याने विहिरीत सावजासह पडल्यावर त्यास कोणतीही इजा न करता त्या दोघांनी एकमेकांच्या सहाय्याने विहिरीबाहेर येण्याचा मोठा प्रयत्नही केला असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. त्यामुळे बिबट्या व कुत्र्याची विहिरीत चांगलीच गट्टी जमल्याचे पहावयास मिळाले.

अजिंठा वन परिक्षेत्र विभागात पळसखेडा शिवारात गट क्रमांक-९८ मधील एका शेतातील संरक्षण कठडे नसलेल्या विहिरीत शिकारी साठी कुत्र्याचा पाठलाग करतांना कुत्र्यासह बिबट्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने पन्नास फुट खोल कोरड्याठाक विहिरीत पडले. विहिरीतील अंधारात मात्र दोघेही बाहेर पाडण्यासाठी एकमेकांना सहाय्य करत होते. परंतु, बिबट्या आणि सावजाला या प्रयत्नात अपयश आल्याने दोघांनीही विहिरीच्या कडा सांभाळल्या, रविवारी शेतकरी शेतात आल्यावर त्यास दोघेही विहिरीच्या कडेला पडलेले आढळून आल्याने तातडीने अजिंठा वनविभागाला माहिती देण्यात आली. यामुळे घटनास्थळी सोयगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, अजिंठ्याचे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश सोनवणे यांनी वनकर्मचाऱ्यासह धाव घेवून अजिंठा वनविभागाकडे असलेल्या संरक्षित पिंजरा विहिरीत टाकून बिबट्याला सुरक्षित रित्या बाहेर काढले व त्यापाठोपाठ कुत्र्यालाही बाहेर काढले दोघांचेही या घटनेत प्राण वाचले आहे.

घटनास्थळी फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांचेसह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.सोयगाव वनपरिक्षेत्राधिकारी राहुल सपकाळ,अजिंठ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे,वनपाल एच.एच,सय्यद,निलेश मुलताने,गणेश नागरगोजे,आदींसह वनविभागाच्या तब्बल १५ कर्मचाऱ्यांनी रेस्कू मोहीम राबवून बिबट्याला अखेर विहिरीबाहेर काढल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास कन्नडचं अभयारण्यात नैस्रागिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या घटनेत मादी प्रजातीचा चार वर्षीय बिबट्या सुरक्षित असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश सोनवणे यांनी सांगितले.

चार तासांच्या रेस्कू मोहिमेत वनविभागाने या मादी प्रजातीच्या चार वर्षीय पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याला विहिरीतून शिताफीने बाहेर काढले सदरील बिबट्या हा जळगावच्या जंगलातून आल्याचा असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.