⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

१२ लाखांच्या कापसासह ट्रक घेऊन चालक फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१। जामनेर तालुक्यातील शेरी येथील ४ शेतकऱ्यांचा कापूस भरून धंधुका (जि. अहमदाबाद) कडे निघालेल्या ट्रकचालकाने तब्ब्ल ११ लाख ८३ हजार रुपयांचा कापूस घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. धंधुका येथे माल पोहोचला की नाही याची विचारपूस करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिनिंग मालकाशी संपर्क केल्यानंतर ट्रक या ठिकाणी आला नसल्याचे समाजल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धर्मराज शांताराम पाटील (वय-३८, रा.शेरी, ता.जामनेर) यांची शेरी शिवारात ८ एकर शेती असून त्यांनी खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड केली होती. कापसाला ८ हजार २५० रुपयांचा भाव मिळत असल्याने त्यांच्यासह गावातील संजय चिंधु पाटील, विनोद कडु काकडे व ज्ञानेश्वर हरी पाटील या शेतकऱ्यांचा माल धंधुका (गुजरात) येथील प्रविणसिंग चावडा (रा. धंधुका, जि. अहमदाबाद, गुजरात) यांच्या मालकीच्या ऍग्रो फायबर प्रॉडक्ट या ठिकाणी पाठविण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे दि.११ नोव्हेंबर रोजी धर्मराज पाटील यांनी पाचोरा येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी येथील संजय रामदास नंदेवार (वय-५०, रा. पाचोरा) यांच्याशी संपर्क साधून गुजरात येथे जाण्यासाठी गाडी बुक केली होती. त्यानुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता एक ट्रक (क्र. जी.जे.०९, झेड.२९१४) शेरी येथे आला होता. या ट्रकमध्ये १४३.५० क्विंटल कापूस भरल्यानंतर बेटावद येथील जय श्रीराम वजन काटा येथे ट्रकचे वजन करून सायंकाळी ५ वाजता हा ट्रक धंधुकाकडे रवाना झाला होता.

ट्रक धंधुकाला पोहोचलाच नाही
लाखो रुपयांचा कापूस असल्याने धर्मराज पाटील हे दर काही तासाने ट्रक चालकाशी संपर्क साधून माहीती जाणून घेत होते. दरम्यान, दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ट्रक चालकाने पाटील यांनी फोन करून ट्रक धंधुका येथे पोहोचल्याची व जिनिंगचे पार्टनर वारीसभाई यांच्याशी संपर्क साधून जिनींगचा पत्ता मिळविला असल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रक ड्रायव्हरने फोन स्विच ऑफ केला. ट्रक ड्रायव्हरने फोन स्विच ऑफ केला म्हणून पाटील यांनी जिनींग मालकाला फोन केला. यावेळी जिनींग मालकाने ट्रक येथे पोहचला नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी ट्रान्सपोर्टचे संजय नंदेवार यांना संपर्क केला मात्र, त्यांनी तुम्ही आमचे ट्रान्सपोर्ट ऑफिसला नोंद न करता परस्पर का पाठविला, अशी विचारणा केली. यावेळी पाटील यांनी तुमचा फोन बंद असल्याचे सांगितले.

ट्रकला बनावट नंबर प्लेट
या घटनेनंतर धर्मराज पाटील, संजय पाटील व विनोद काकडे आदी शेतकऱ्यांनी धंधुका गाठत ट्रक व चालकाचा शोध घेतला. मात्र ट्रक व चालक मिळून आले नाही. त्यानंतर पाटील यांनी एका ऍपमध्ये ट्रक क्रमांक टाकून शोध घेतला असता, हा ट्रक शोएब पटेल (रा.गोध्रा, गुजरात) यांच्या नावावर असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी दि.१७ रोजी संबंधित पत्तावर जावुन चौकशी केली. यावेळी शोएब पटेल हे हज यात्रेकरीता सौदीला गेले असल्याने त्यांचा मुलगा अमीर पटेल यांच्याकडे या ट्रकबाबत विचारणा केली. त्याला ट्रकचे फोटो दाखविले असता, त्यांने फोटोमधील ट्रक आमचा नसून बनावट नंबरप्लेट लावली असल्याचे त्याने सांगितले व त्याच्या मालकीच्या ट्रकचे फोटो देखील दाखविले. त्यानंतर कापुस भरण्यासाठी आलेल्या चालकाने नंबर प्लेट बदलून फसवणुक केल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी बोचासन टोलनाका येथील सीसीटीव्ही तपासले. यावेळी त्यांना हा ट्रक दि.१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१० मिनीटानी या ठिकाणाहून गेल्याचे आढळून आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पहूर गाठत ट्रक चालक व क्लिनरविरोधात पहूर पोलिसात तक्रार दाखल केली.