⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

चालकाला सहप्रवाशाने चहातून दिले गुंगीचे औषध, सव्वातीन लाखांचा माल लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । मालवाहतूक करणाऱ्या सहप्रवाशाने चहा पाजला आणि चालकाला गुंगी येताच शिवना ता. सिल्लोड येथील व्यापाऱ्याचा तीन लाख ३१ हजार रुपये किंमतीचा माल औरंगाबाद महामार्गावरील गाडेगाव ते पहूर च्या दरम्यान लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी मध्यरात्री मालक साईनाथ काळे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला घटनाक्रमाची पडताळणी सुरु केली आहे. चालकाने सांगितल्यानुसार स्पॉट तपासणीही सुरु केली आहे. चालकाच्या जबाबानुसार तपास सुरु असून काहीठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

चालकाला आली सकाळी जाग!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील व्यापारी साईनाथ साहेबराव काळे (शिवना ता. सिल्लोड) यांनी स्वतःच्या माल वाहतूक वाहन घेऊन चालक सांडू तडवी याला जळगाव येथे सोमवारी पाठविले. चालक चळीराम पेठेतून रात्री साडेनऊच्या सुमारास तीन ताख ३१ हजार रुपयांचा माल घेऊन शिवनीकडे निघाला.

यादरम्यान अजिंठा चौफुलीवरून अज्ञात व्यक्ती सोबत बसला. गाडेगाव ते पहूर दरम्यान दोन्हींनी चहा घेतला. यानंतर चालकाला काहीच आठवले नाही. मंगळवार रोजी सकाळी चालकाला पहूर येथे जाग आली.

यानंतर माल लंपास झाल्याचे त्याला आढळून आले. व सोबत असलेला व्यक्ती ही बेपत्ता झाला होता. संबधित घटनेची माहिती मालकाला दिली.

हे देखील वाचा :