मोठा निर्णय! मोदी सरकारने 74 औषधांच्या किमती केल्या कमी..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२३ । महागाईने जनता होरपळून निघत असताना मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला मोदी सरकारने सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा झटका दिला होता. मात्र दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असून अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. Medicines Reduced Prices

सरकारने 74 औषधांची किंमत निश्चित केली असून या निर्णयामुळे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सरसह अनेक आजारांवरील औषधांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA), औषधांची किंमत ठरवणारी सरकारी नियामक संस्था, त्यांच्या 109 व्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीच्या आधारे प्राधिकरणाने औषधे आदेश 2013 अंतर्गत किंमती निश्चित केल्या आहेत.

NPPA ने निश्चित केलेल्या औषधांमध्ये, मधुमेहावरील औषध Dapagliflogen आणि Metformin (Dapagliflozin Sitagliptin आणि Metformin Hydrochloride) च्या एका गोळीची किंमत 27.75 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या AstraZeneca कंपनीचे हे औषध 33 रुपये प्रति टॅबलेटमध्ये उपलब्ध आहे.

त्याचप्रमाणे, एनपीपीने एलमिसार्टन आणि बिसोप्रोलॉल (एलमिसार्टन आणि बिसोप्रोलॉल फ्युमर) या ब्लडप्रेशर औषधाच्या एका गोळीची किंमत 10.92 रुपये निश्चित केली आहे. सध्या हे औषध 14 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. Amoxicillin च्या एका कॅप्सूलची किंमत 2.18 रुपये तर Cetirizine ची किंमत 1.68 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, ibuprofen ची 400 mg ची टॅब्लेट कमाल 1.07 रुपये इतकी निश्चित करण्यात आली. 

कर्करोगाच्या इंजेक्शनची निम्मी किंमत
प्राधिकरणाने ज्या 74 औषधांसाठी किरकोळ किंमत निश्चित केली आहे, त्यापैकी अनेक औषधांच्या किमती दुपटीहून अधिक आहेत. मात्र, त्या रचनेतील काही औषधांची किंमत निर्धारित किंमतीपेक्षा कमी आहे. परंतु एनपीपीएने किंमत मर्यादा निश्चित केल्यानंतर कंपन्या या 74 औषधांची किंमत यापेक्षा जास्त ठेवू शकत नाहीत.

प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे कर्करोगाच्या इंजेक्शनची किंमत निम्म्याहून कमी होणार आहे. NPPA ने कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणार्‍या फिलग्रास्टिम इंजेक्शनची किंमत 1034.51 रुपये निश्चित केली आहे. फिलग्रास्टिनची किंमत कंपनीनुसार बदलते. Encure Pharmaceutical ने या रचनेच्या एका इंजेक्शनची किंमत 2800 रुपये ठेवली आहे, तर Lupin कंपनीच्या Lupfil ची किंमत 2562 रुपये आहे. त्याचप्रमाणे सन फार्मा कंपनीने या रचनेसह इंजेक्शन एक्सफिलची किंमत 2142 रुपये ठेवली आहे.

मागील महिन्यातही औषधांचे दर केले होते निश्चित
मागील महिन्यात 128 अॅण्टीबायोटिक्स आणि अॅण्टीव्हायरल औषधांच्या किंमती निश्चित केल्या होत्या. यामध्ये अमोक्सिसिलिन आणि क्लेव्हुलेनिक ऍसिडचे प्रतिजैविक इंजेक्शन, व्हॅनकोमायसिन, दम्याच्या आजारामध्ये वापरले जाणारे सल्बुटामोल, कर्करोगाचे औषध ट्रॅस्टुझुमॅब, वेदना कमी करणारे आयबुप्रोफेन आणि तापामध्ये दिलेले पॅरासिटामॉल यांचा समावेश आहे.