⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

मनपाने वॉटरग्रेसला दिलेली ४२ वाहने नादुरुस्त? कंपनीकडून मनपाच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षदा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहरातील कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला असून दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. जळगाव मनपाने वॉटरग्रेससोबत केलेल्या करारानुसार वॉटरग्रेस कंपनीला महानगरपालिकेतर्फे १३३ वाहने हस्तांतरित करण्यात आले होते, त्यापैकी ४२ वाहने सध्या नादुरुस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मनपाकडून पत्रव्यवहार करून देखील वॉटरगेस कंपनीतर्फे वाहने सुरू करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने मनपातील सूत्रांनी सांगितले.

जळगाव शहरातील कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. एकीकडे शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शहर मनपाकडे पैसे नसून दुसरीकडे वॉटरग्रेसला दरमहा सरासरी दीड कोटीची रक्कम अदा करण्यात येत आहे. मनपातील सत्ताधारी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींची वॉटरग्रेसच्या कामाबद्दल ओरड असताना देखील हे सर्व सुरु असल्याचे जळगाव लाईव्ह न्यूजने समोर आणले होते. गेल्या दोन दिवसात मनपात माहिती घेतली असता अधिकारी देखील वॉटरग्रेस विरुद्ध माहिती देण्यास धजावत नसल्याचे निर्दशनास आले आहे.

जळगाव मनपाने वॉटरग्रेससोबत केलेल्या करारानुसार शहरातील कचरा संकलनासाठी वॉटरग्रेसला दिलेल्या वाहनांची देखभाल करणे हे संबंधित ठेकेदाराचे काम आहे. मात्र संबंधित ठेकेदार हे काम करत नाहीये. कित्येकदा महानगरपालिकेतर्फे पत्रव्यवहार करून याबाबत विचारपूस करून देखील वॉटरग्रेस कंपनी या बंद अवस्थेत असलेल्या वाहनांची दुरुस्ती करण्यास असमर्थता दर्शवत असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

वाहनाचे टायर खराब होणे, गाडीचा मेंटेनन्स न होणे, बॅटरी नादुरुस्त होणे, गाडीचे इंजिन नादुरुस्त झाले अशा अनेक कारणांनी ४२ वाहने सध्या पडून आहेत. नादुरुस्त वाहने सुरु करावी आणि त्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी असे कित्येक पत्रांचे ढीग महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे संबंधित ठेकेदाराला देण्यात आले. आहेत मात्र कोणतीही कारवाई संबंधित ठेकेदार करत नाहीये आणि विशेष बाब म्हणजे संबंधित ठेकेदाराला महानगरपालिका याबाबतचा जाबही विचारत नाहीये. मनपातील प्रतिनिधी देखील यावर आवाज उठवत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी प्रत्येक वाहनाचे दरवर्षीचे घसारा मूल्य (डेप्रिसिएशन कॉस्ट) ही वॉटरग्रेस कंपनीने महानगरपालिकेकडे जमा करणे अपेक्षित आहे. वर्षाला १५ टक्के घसारा मूल्य आकारण्याचा नियम असून मक्तेदार महानगरपालिका प्रशासनाला हे घसारा मूल्य देण्यात टाळाटाळ करीत आहे. मक्तेदाराकडून मनपाच्या पत्रांना हरताळ फासण्याचा प्रयत्न म्हणजे सत्ताधारी आणि जळगावकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना चपराकच आहे.

मनपाने दिली ८५ वाहने, पण… : उपमहापौर कुलभूषण पाटील
माझ्या माहितीप्रमाणे जळगाव मनपाने वॉटरग्रेस कंपनीला कचरा संकलनासाठी ८५ घंटागाड्या दिल्या आहेत आणि त्यांची देखभाल करणे हे ठेकेदाराचे काम आहे. मात्र आता ठेकेदार हे काम करत नसल्याने त्यावर मनपाने कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया जळगाव मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

मनपा प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार : आयुक्त डॉ.विद्या गायकवाड
जळगाव मनपाने वॉटरग्रेस कंपनीला हस्तांतरित केलेली वाहने दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन वारंवार वॉटरग्रेसला पत्र देत असते. वाहने दुरुस्त होऊन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावे हीच मनपाची भूमिका आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली आहे.