⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत, सुपेंना दिले होते ३० लाख

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरण उघड झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या गैरव्यवहार प्रकरणातील तपासाचे धागेदोरे जळगावपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये दिले. शिवकुमार याने स्वतः ही माहिती तपासादरम्यान पोलिसांना दिली. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आले. असते; परंतु सुपे याने ते दाबून टाकले.

२०१८ साली झालेल्या टीईटी परीक्षेच्या निकालाबाबत राज्य परीक्षा परिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर जबाबदार पदावर काम करीत असताना सुपे यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही गंभीर बाबही तपासात उघड झाली आहे..

या गुन्ह्याच्या तपासासाठी सुपे (५८, रा. पिंपळे गुरव) आणि परीक्षा घेणाऱ्या जीए टेक्नॉलॉजी प्रा. लि., कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचे एजंट संतोष लक्ष्मण हरकळ (४२, रा. औरंगाबाद) व अंकुश रामभाऊ हरकळ (४४, रा. बुलडाणा) यांना अटक करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्र आल्यानंतर सुपे यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही? प्रमाणपत्र मिळालेले १८ विद्यार्थी कोण. आहेत तसेच तपासादरम्यान पुढे आलेल्या विविध बाबींचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. न्यायालयाने आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, तपासाचे धागेदोरे जळगावपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे.

हे देखील वाचा :