⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तालिबानचा चीनवर डिजिटल स्ट्राइक! PUBG सह Tiktok वर बंदी घालणार, कारणही सांगितलं..

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । तालिबान सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राइक करत PUBG आणि Tiktok अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. येत्या तीन महिन्यांत अफगाणिस्तानमध्ये या गेमवर बंदी घालण्यात येणार असून या गेमवर हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या दूरसंचार मंत्री आणि शरिया कायदा अंमलबजावणी प्रशासन यांच्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर तालिबानने येत्या ९० दिवसांत देशात PUBG आणि TikTok सारख्या चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

तालिबानच्या या निर्णयानंतर, इंटरनेट यूजर्सनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. ते तालिबानची खिल्लीही उडवताना दिसत आहेत. कारण खुद्द तालिबाननेच हिंसाचाराच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. तसेच, हा गेम हिंसाचाराला उत्तेजन देतो, असे सांगत त्यावर बंदी घालत आहे. लोकप्रिय अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा करण्यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी सुमारे 23 दशलक्ष वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. या वेबसाइट्सवर अनैतिक मजकूर दाखवला जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

या अ‍ॅप्सवर भारतात बंदी
अफगाणिस्तानपूर्वी, टिकटॉक आणि PUBG मोबाइल अ‍ॅपवर भारताने बंदी घातली आहे. तथापि, भारत सरकारने TikTok आणि PUBG मोबाइलवर बंदी घातली होती कारण वापरकर्त्यांची डेटा गोपनीयता आणि देशाची एकता आणि अखंडता. त्याचबरोबर हिंसेला प्रोत्साहन आणि मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या या गेमवर पाकिस्ताननेही बंदी घातली आहे.