जळगावात ९० टक्के पाऊस पडला, पण हवामान विभागाचे अंदाज ८८ टक्के फोल!

ऑगस्ट 29, 2026 8:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । यंदाच्या पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यावर निसर्गाची समाधानकारक कृपादृष्टी राहिली आहे. एल निनोचा प्रभाव असतानाही जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतशिवारातील स्थिती सध्या चांगली असली, तरी दुसरीकडे हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजांबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

rain

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण आणि स्वरूप हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पूर्णपणे वेगळे राहिले आहे. १ जून ते २६ ऑगस्ट या कालावधीत हवामान विभागाने दिलेल्या विविध अंदाजांपैकी तब्बल १६ दिवसांचे अंदाज चुकीचे ठरले आहेत. वारंवार अंदाज चुकत असल्याने हवामान विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि अंदाजांच्या अचूकतेवर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

यंदा जिल्ह्यात अनेकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, अपेक्षित ठिकाणी पाऊस न पडता काही भागात अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. काही वेळा अलर्ट जारी असतानाही पावसाने हुलकावणी दिली, तर अलर्ट नसलेल्या दिवशी काही भागांत जोरदार पाऊस झाला. या बदलत्या परिस्थितीमुळे हवामानाच्या अंदाजाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अलर्ट दिला, पण पाऊस गायब

१ जून ते २६ ऑगस्ट या कालावधीतील आकडेवारीनुसार हवामान विभागाने एकूण १८ दिवस पावसाबाबत अलर्ट दिला. त्यापैकी केवळ २ दिवस अंदाज अचूक ठरला, तर १६ दिवस अंदाज चुकीचा ठरला. त्यामुळे अंदाज चुकण्याचे प्रमाण ८८ टक्के इतके राहिले आहे.

अंदाज का चुकत आहेत?

स्थानिक वातावरणातील वेगाने होणारे बदल, भौगोलिक विस्तार आणि नैसर्गिक घटकांचा प्रभाव यांमुळे अंदाजांमध्ये फरक पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आधुनिक तंत्रज्ञान असूनही वातावरणातील सूक्ष्म बदलांचा अचूक अंदाज बांधणे आव्हानात्मक ठरते. जळगाव जिल्ह्याच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे एका भागात पाऊस पडतो, तर काही किलोमीटर अंतरावर ऊन असते.

हवामानातील वेगाने होणारे स्थानिक बदल लक्षात घेता, आगामी काळातही पावसाचा अंदाज आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये कितपत ताळमेळ राहतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now