जळगाव शहर

जळगावात मोकाट कुत्र्याने घेतला तरुणाचा बळी! १२ दिवसांत जिल्ह्यात दुसरा बळी

जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसापूर्वी भुसावळात कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी ९ वर्षीय बालकाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता जळगाव शहरातही ३० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पिंप्राळा-हुडको परिसरात महिनाभरापूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रेबीजमुळे अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. शेख ताहेर शेख फारुख (वय ३०, रा. पिंप्राळा-हुडको, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जळगावकरांमध्ये प्रचंड भीती व महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

shekh taher

मृत शेख ताहेर हा तरुण हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. २५ एप्रिल रोजी घराजवळ अचानक एका मोकाट कुत्र्याने शेख ताहेरसह परिसरातील इतर सात ते आठ जणांवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने ताहेरच्या हाताचे अक्षरशः लचके तोडले होते.

सिरम न घेतल्याने ओढवला प्रसंग

हल्ल्यानंतर ताहेरने तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन अँटी-रेबीज लस (ARV) घेतली होती. मात्र, डॉक्टरांच्या मते त्याची जखम अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने लसीसोबतच रेबीजचे विशेष सिरम घेणे अत्यंत गरजेचे होते. दुर्दैवाने ते सिरम वेळेत घेतले गेले नाही. महिना उलटत आला असताना, २१ मे रोजी अचानक ताहेरची प्रकृती खालावली आणि त्याला रेबीजची स्पष्ट लक्षणे दिसू लागली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच २२ मे रोजी पहाटे १:२५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

या हृदयद्रावक घटनेनंतर जळगाव महापालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आणि नसबंदी मोहीम राबवण्यात मनपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत स्थानिक नगरसेवकांनी थेट संबंधित मनपा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने आतातरी जागे होऊन मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आर्त हाक जळगावकर देत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button