⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तंत्रज्ञान वापरासोबत माहिती सुरक्षेवर लक्ष देणे आवश्यक

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । माहिती तंत्रज्ञानावर अवलंबित्व स्विकारलेल्या जगासमोर डाटा अर्थात माहितीची सुरक्षा हे मोठे आव्हान आहे, त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबर अमूल्य माहितीची सुरक्षाही महत्वाची आहे. याबाबतचा निष्काळजीपणा मोठ्या संकटांना निमंत्रण देणारा ठरु शकतो, असे मत जागतिक संगणक सुरक्षा दिवसानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘इन्फोटेक फोर मी’ संस्थेतर्फे एका संवाद वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संगणक, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासक दिपक वडनेरे, विद्यापीठातील संगणक तज्ज्ञ समाधान पाटील, मोबाईल तज्ज्ञ योगेश निकम, डॉ. सोमनाथ वडनेरे व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सोशल मीडिया शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.

संगणक, लॅपटॉप, मोबाईल सुरक्षेइतकीच माहितीची सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण असून संपूर्ण जग या साधनाद्वारे माहिती आणि संवाद तंत्रज्ञानामुळे एकत्र आले आहे. अशा वेळेस वैयक्तिक माहिती, प्रशासकीय माहिती, देश सुरक्षेची माहिती, कार्यालयीन दस्तऐवज आदींच्या गोपनियतेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असणे गरजेचे आहे. यातील थोडीशी निष्काळजी मोठ्या संकटास निमंत्रण देणारी ठरते. तेव्हा तंत्रज्ञानाच्या भौतिक सुरक्षे बरोबरच माहितीच्या सुरक्षेस तितकेच प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले. या वेबिनारमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट, डाटाबेस आदिंच्या सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.