⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावात सुरू आहे ‘लुटारू भिशी’चे सर्वात मोठे ‘सिंडिकेट’

नियमीत भिशी उरली नावालाच लिलाव आणि लकी ड्रॉ भिशीतून होतोय सावकारी धंदा

जळगाव लाईव्ह न्यूज | चेतन वाणी | भिशी म्हणजे पैसे बचतीचा एक साधा सोपा मार्ग. भिशी प्रकार तसा फार जुना आणि लोकप्रिय असला तर आता त्याचा गैरवापर सुरू झाला आहे. भिशीच्या माध्यमातून गोरगरिबांची लूट करणारे मोठे रॅकेट जळगावात सक्रिय झाले आहे. लुटारू गँगकडून लिलाव आणि लकी ड्रॉ भिशी चालवली जात आहे. १ लाखांपासून १ कोटीपर्यंत भिशी चालवली जात असून मातब्बर व्यापारी आणि काही दोन नंबरवाले उर्वरित पैशातून सावकारी धंदा करीत आहे. पोलीस आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने लुटारू भिशी चालकांचे फावले होत आहे.

भिशीचे साधारणतः तीन प्रकार असतात. एक म्हणजे गल्लोगल्ली, मित्रांमध्ये खेळली जाणारी नियमित भिशी. दुसरी म्हणजे जमलेल्या रकमेतून लिलाव करून काही रक्कम कमी स्वीकारली जाणारी लिलाव भिशी. तिसरा प्रकार म्हणजे लकी ड्रॉ भिशी. आपला क्रमांक आला की पुढील रक्कम देणे बंद करायचे अशी ती लिलाव भिशी असते.

अशी असते लिलाव भिशी
लिलाव भिशी म्हणजे समजा, १० जणांच्या गटात प्रत्येकाने महिन्याला वीस हजार रुपये भरल्यास एकूण रक्कम दोन लाख रुपये जमा होते. रोख रक्कम एका टेबलवर ठेवायची आणि सभोवती दहा जणांनी बसायचे. लिलावाला सुरुवात केल्यावर दोन लाख रुपये ज्याला हवे त्याने बोली लावायची. म्हणजेच दोन लाख रुपये अधिकचे वीस ते तीस हजार रुपये देऊन घ्यायची तयारी दाखवायची. समजा एखाद्याने तीस हजार रुपये लिलावात बोली केली तर त्याला दोन लाख भिशीच्या रकमेतून तीस हजार रुपये कापून घेऊन एक लाख ७० हजार रुपये मिळतात. पुढे त्याने नियमित १० हजार प्रमाणे दोन लाख रुपये पूर्ण भरायचे. भिशीतून कापून घेतलेले तीस हजार रुपये दहा जणांनी प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे निव्वळ नफा म्हणून वाटून घ्यायचे, अशी ती लिलाव भिशी असते.

अशी असते लकी ड्रॉ भिशी
लकी ड्रॉ भिशी म्हणजे, समजा १०० जणांनी १० हजार रुपये महिना जमा केल्यास महिन्याला १० लाख रुपये जमा होतात. प्रत्येकाने महिन्याला १० हजार रुपये भरायचे असतात आणि ज्या महिन्याला ज्याची भिशी लागली त्याने पुढील रक्कम देणे गरजेचे नसते. भिशी १५ ते ५० महिने चालवली जाते. भिशीची रक्कम दिल्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम भिशी खेळविणारे स्वतःच्याच फायद्यासाठी वापरतात. ज्याची भिशी लागली त्याला १० हजार दिल्यानंतर शिल्लक ९ लाख ९० हजार ते व्याजाने देतात आणि त्यातून बक्कळ पैसे कमावतात. भिशीचे ठरविलेले महिने संपले की उरलेल्या सर्व सदस्यांना त्यांची मूळ गुंतवणुकीची रक्कम परत दिली जाते.

लिलावातून लाखोंची उलाढाल
भिशीचे हे उदाहरण केवळ प्रातिनिधिक आहे. महिन्याला ३ हजारांपासून ते ५ लाख रुपये प्रत्येकी भरणारे अनेक भिशी मेंबर जळगावात आहेत. अशा भिशीत रक्कम आणि सदस्य संख्या मोठी असते. लिलाव आणि लकी ड्रॉ भिशीमध्ये भिशीचा हप्ता भरण्यास कधी कधी टाळाटाळ होते. हप्ता भरायला एक दिवस उशीर झाला तरी दिवसाला १ हजार रुपये ते १० हजार रुपये दंड शुल्क आकारले जाते. आणि येथेच भिशीचे काळे अंतरंग दिसायला सुरुवात होते. भिशीचे पैसे वसूल करायला एक यंत्रणा राबू लागते. आणि मग प्रकरण मुद्द्यावरून गुद्यावर येते. त्याला गुंडगिरीची जोड मिळते.

उर्वरित वाचा उद्या…