⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आ.गिरीश महाजनांसह १२ आमदारांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करणे भाजपच्या १२ आमदारांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण विधानसभा सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं. त्याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी आज सुनावणी झाली. मात्र न्यायालयानं आमदारांचं निलंबन रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्याच भाजपच्या आमदारांनी कडाडून विरोध केला. यावेळी त्यांनी सभागृहात गदारोळ घालत तालिका अध्यक्ष यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षांकरता निलंबित करण्यात आले. या ठरावाविरोधात निलंबित भाजपच्या आमदारांनी सुप्रीम कोर्टात २२ जुलैला याचिका दाखल केली होती. या आमदारांना विधिमंडळ अधिवेशनात ५ जुलैला निलंबित करण्यात आलं होतं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी धक्काबुक्की केल्याच्या आरोपातून आमदारांना निलंबित केलं गेलं होतं.

या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात या आमदारांना हजर राहता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होईल.

निलंबित आमदारांमध्ये कोण-कोण?
भाजपच्या ज्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यात संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांडडिया यांचा समावेश आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करत निलंबनाच्या स्थगितीला नकार दिला आहे. विधनसभेच्या ठरावाला अंतरिम स्थगिती देता येणार नाही, आमदारांनी यासंदर्भात अध्यक्षांकडेच विनंती करावी, अशी सूचना कोर्टाने दिली आहे.