जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले असून आज जळगाव शहरात एकाच दिवसात ३० रॅली निघणार आहेत. यामुळे जळगावचे राजकारण चांगलेच तापणार आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर दोन दिवसानंतर म्हणजेच १३ जानेवारी रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यामुळे शेवटच्या काही तासांत मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी आज उमेदवारांचा जोर पाहायला मिळणार आहे. आज रविवारी मतदारांच्या भेटीसाठी एकाच दिवसात ३० रॅली निघणार आहेत.

सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा, रॅली आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे. थंडी असली तरी जळगावचे राजकीय वातावरण आज चांगलेच तापणार असून प्रत्येक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहे.
प्रभाग पिंजून काढण्यासाठी सकाळपासून सुरू होणारी पायपीट रात्री उशिरापर्यंत सुरू असून उमेदवार आणि कार्यकर्ते घामाघूम झाले आहेत.आतापर्यंत महानगरपालिकेकडे विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून रॅलीसाठी तब्बल ४८८ अर्जाची नोंद झाली आहे. ४ जानेवारीपासून आतापर्यंत २३६ रॅली यशस्वीपणे पार पडल्या.
महायुतीच्या तीनही पक्षांचा आज महाड्राइव्ह
महायुतीच्या तीनही पक्षांकडून रविवारी महाड्राइव्ह नियोजन करण्यात आले आहे. बुथ स्तरावरील कार्यकर्त्यापासून शहरात राहणाऱ्या प्रदेश पदाधिकाऱ्यापर्यंत सर्व जण सकाळी ८ ते १२ यावेळेत घरोघरी जाऊन वचननामा देणार आहेत. यात १० हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक पदाधिकारी तीन ते चार सहकाऱ्यांसह किमान ५० ते १०० घरांना भेटी देणार आहेत. भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांनाही यासंदर्भातील निरोप दिले आहेत. दरम्यान, मोठे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ लागली आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मनपात १२ जानेवारीच्या रॅलीसाठी २० नवीन अर्ज दाखल झाले आणि सायंकाळपर्यंत ही संख्या आणखी वाढली.











