जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली है. उद्या शुक्रवारी (दि २५ सप्टेंबर) दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.सध्या मुख्यमंत्री विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असून, अमरावती विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

राज्यात अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. काही शेतकऱ्यांनी नांगर फिरवून उभी पिके काढून टाकली, तर काही ठिकाणी पिके जाळण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत होती.

यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे.आज मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की,राज्याच्या दुष्काळ संहितेतील नियमांनुसार (Trigger 1 प्रमाणे) दुष्काळ जाहीर करण्याचा शासन आदेश शुक्रवारी काढला जाणार आहे. या आदेशामध्ये कदाचित एखादा भाग राहिल्यास, ‘ट्रिगर थ्री’ नुसार त्या भागाचाही नंतर समावेश केला जाईल. मात्र, सकृतदर्शनी जिथे-जिथे दुष्काळ दिसत आहे, त्या सर्व भागांना या निर्णयात सामावून घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आपण शेतकऱ्यांना विम्याचे देखील पैसे देणार आहे. तसेच ग्रामीण भागात उद्भवणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.











