जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । देशात महागाई पुन्हा हळूहळू वाढताना दिसत आहे. यात ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर वाढत असल्याने आगामी काळातील सणांमधील गोडव्यावर याचा परिणाम होणार आहे. मागील ६ वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. साखरेसह तूरडाळीचे दरही भडकले आहे. यामुळे सर्वसामान्यांचेही बजेट कोलमडले आहे.
घाऊक बाजारात वाढत्या दरवाढीत साखरेला मागणी कमी असली तरी साठेबाजीमुळे ऐन सणासुदीत साखरदरात वाढ होत आहे. कारखान्यांवर साखरेच्या निविदा क्विंटलमागे पुन्हा १०० रुपयांनी भडकल्या असून, घाऊक बाजारात साखरेचे दर क्विंटलला ६० ते ७५ रुपयांनी पुन्हा कडाडले असून, दर ४०७० ते ४०८० रुपयांवर पोहचले आहेत.
याशिवाय रोजच्या जेवणातील तूरडाळ तब्बल १७५ ते १८० रुपये किलोंवर पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात साखरेचे प्रतिकिलोचे दर आता ४२ ते ४३ रुपयांवर पोचल्याने सर्वसामान्य नागरिकांना साखर कडू झाली आहे. साखरेची ही दरवाढ अशीच सुरू राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, टोमॅटो आणि कांद्याच्या वाढत्या भावापासून दिलासा मिळालेला असताना साखरेने नवे संकट उभे केले आहे.यावर उपाय योजना न केल्यास ऐन सणासुदीच्या हंगामात साखरेचे भाव आणखी वाढू शकतात. पुढील साखर हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे भाव झपाट्याने वाढत आहेत.
दरम्यान ऐन सणासुदीत तूरडाळही महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ आता १७५ ते १८० रुपये किलोवर गेली आहे. तर अन्य डाळींच्या दरातही वाढ झाली आहे.