⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Big Breaking : सुकी गारबर्डीच्या वेस्ट वेअरमध्ये अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचविण्यात यश

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । जिल्ह्यातील सुकी गारबर्डी धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकले होते. अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतल्यावर, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रात्री १० वाजेच्या सुमारास सर्वांना बाहेर काढण्यात यश आले आहे. संपूर्ण बचाव कार्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे लक्ष ठेवून होते.

संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून आज दुपारी रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील गारबर्डी धरण देखील पूर्ण भरले. बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने नदी पात्रात ९ पर्यटक अडकले. स्थानिक कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे होते तर पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने होता. जर पाण्याचा प्रवाह अजून वाढला तर हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आवश्यक साहित्य व मनुष्यबळासह घटनास्थळी धाव घेतली. धुळे येथील SDRF चे पथक बचावकार्यासाठी मागविण्यासाठी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात देखील कळविण्यात आले होते. सायंकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात झाली. पावसाची संततधार आणि नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असताना जीवावर खेळून रात्री १० वाजेच्या सुमारास अंधारात बचावकार्य करीत सर्व ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. सर्वांना उपचारार्थ सावदा येथे आणण्यात येत आहे.

सुकी धरणाच्या सांडव्याच्या खाली नदी पात्रात अडकलेल्या व्यक्तींमध्ये अतुल प्रकाश कोळी वय-२०, विष्णू दिलीप कोलते वय-१७, आकाश रमेश धांडे वय-२५, जितेंद्र शत्रुघ्न कूंडक वय-३०, मुकेश श्रीराम धांडे वय-१९, मनोज रमेश सोनवणे वय-२८, लखन प्रकाश सोनवणे वय-२५, पियूष मिलिंद भालेराव वय-२२, गणेशसिंग पोपट मोरे वय-२८ सर्व रा.मुक्ताईनगर यांचा समावेश होता. सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

बचाव कार्यात स्थानिक नागरिक इम्रान शहा रतन शहा रा. पाल, संतोष दरबार राठोड रा.पाल, रतन भंगी पावरा रा.गारखेडा, तारासिंग रेवलसिंग पावरा रा.गारबर्डी, सिद्धार्थ गुलजार भिल यांच्यासह आमदार शिरीष चौधरी, तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर तहसील टीम, एपीआय देविदास इंगोले, पीएसआय समाधान गायकवाड, सावदा/रावेर पोलीस स्टेशन टीम, प्रांत फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी, अनिल नारखेडे, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले. पर्यटकांना वाचवण्यासाठी बचाव कार्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, कार्यकारी अभियंता श्री.बेहेरे हे लक्ष ठेवून होते.