जळगाव जिल्ह्यात एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी हँडलरशी कनेक्शन असलेल्या ८ ते १० संशयितांची चौकशी!

जुलै 11, 2026 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्कात असलेल्या संशयितांविरोधात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यभरात मोठी धडक मोहीम उघडली आहे. शुक्रवारी एटीएसच्या १४ प्रादेशिक युनिटमधील ५८ पथकांनी एकाचवेळी राज्यातील सुमारे १५० ठिकाणी छापेमारी करत ११२ संशयितांची चौकशी केली. या मोहिमेअंतर्गत जळगाव, भुसावळ आणि रावेर परिसरातील ८ ते १० संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलीय. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ats

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) शी कथित संबंध असलेल्या सोशल मीडिया नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी ही व्यापक कारवाई करण्यात आली.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गँगस्टर शहजाद भट्टी हा फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय तरुणांना जाळ्यात ओढत होता. या नेटवर्कमध्ये आबिद जाट ऊर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन, अशरफ बशीर आलम यांसारख्या पाकिस्तानस्थित हँडलर्सचा सहभाग समोर आला असून एटीएस या दिशेने कसून तपास करत आहे.

भारतीय तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे कट्टरपंथीकरण करणे, देशाची गुप्त माहिती गोळा करणे, अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची वाहतूक आणि स्थानिक पातळीवर ‘स्लीपर सेल’ तयार करून देशविघातक कारवायांसाठी त्यांचा वापर करणे, हा या नेटवर्कचा मुख्य उद्देश असल्याचा संशय एटीएसला आहे.

या व्यापक मोहिमेचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच एटीएसचे पथक जिल्ह्यात दाखल झाले होते. एटीएसने भुसावळ, रावेर आणि जळगाव शहरात मिळून सुमारे ८ ते १० संशयितांची चौकशी केली. भुसावळातून दोन तरुणांना एटीएसने सकाळी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात असून, तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

एटीएसची ५८ पथके अ‍ॅक्शन मोडमध्ये

या कारवाईसाठी एटीएसच्या १४ प्रादेशिक युनिट्समधील ५८ विशेष पथके तैनात करण्यात आली होती. यापूर्वी मे महिन्यातही एटीएसने शहजाद भट्टीच्या या कथित नेटवर्कविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकाच वेळी १५० ठिकाणी छापे टाकून एटीएसने पाकिस्तानी हँडलर्सच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. या कारवाईमुळे राज्यभरात आणि विशेषतः खान्देशात मोठी खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories