जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२३ । भुसावळ शहरातील श्रीनगर परिसरातील पथदिवे वादळामुळे शनिवार २९ एप्रिल पासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात एकीकडे दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढत असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पथदिवे बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार महावितरणला सांगूनही पथदिवे दुरुस्त होत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकारांनी केला आहे.
स्वखर्चाने पथदिवे दुरुस्त करून घ्या
बंद पथदिव्यांमुळे अडचणी वाढल्याने नागरिकांनी वारंवार तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदवली. ज्याप्रमाणे स्वखर्चाने वीज तारा जोडून घेतल्या त्याचप्रमाणे पथदिवे दुरुस्त करून घ्यावी अशी उत्तरे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिली आहेत.
पथदिवे बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पायी जाण्यास त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वाहन सुसाट जातात. त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे येथील पथदिवे महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व स्थानिक नागरिकांनी केली आहे.