
जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी दिवाळी आणि छठपूजा उत्सव काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) -हटिया दरम्यान विशेष साप्ताहिक उत्सव गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या एकूण ६ सेवांसह चालविण्यात येणार असून या गाडीला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहेत. मात्र, या गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही.
गाडी क्रमांक ०८६१० लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया ही साप्ताहिक विशेष गाडी १३ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.३० वाजता हटिया येथे पोहोचेल. एकूण ३ फेऱ्या असतील.
गाडी क्रमांक ०८६०९ हटिया ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक विशेष गाडी १२ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दर सोमवारी हटिया येथून १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, बानो, गोबिंदपूर रोड आणि बालसीरिंग या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना चाळीसगाव, पाचोरा किंवा भुसावळ स्थानकावरून या विशेष गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
उत्सव काळातील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन या विशेष गाड्यांमुळे उत्तर भारत व मध्य भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





