
जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना हवामानाच्या लहरीपणामुळे कृषी उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टी अशा विषम परिस्थितीमुळे तांदूळ तसेच डाळींच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांत डाळींच्या दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ यांसह विविध डाळींच्या किमती वाढल्या आहेत.
गेल्या महिन्याच्या तुलनेत तूर डाळीच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली असून, ती १२० रुपयांवरून १४० रुपये किलो झाली आहे. मूग डाळ १२० रुपयांवरून १३० रुपये, तर चणा डाळ ८५ रुपयांवरून ९५ रुपये किलो झाली आहे. उडीद पांढरी डाळीच्या दरातही १० रुपयांची वाढ होऊन ती १३० वरून १४० रुपये किलो झाली आहे. मसूर डाळीचा दर सध्या १०० रुपये किलो आहे.
सणासुदीच्या काळात डाळी, तांदूळ आणि इतर सामानाची मागणी अधिक असते. मात्र, ऐन सणाच्या काळातच डाळींचे दर वाढल्याने महिन्याचे बजेट कसे सांभाळायचे, असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. आधीच वाढलेल्या इंधन आणि भाजीपाल्याच्या दरांनी त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता डाळींच्या भाववाढीमुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उत्पादन घटल्याने येत्या दिवसांतही हे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.





