जळगाव जिल्हा

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना फोन नको; अवैध सावकारीवर कारवाई करा – महसूल मंत्री बावनकुळे

जळगाव लाईव्ह न्यूज । महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील शेतकरी मधुकर पाटील यांच्या शेतात भेट देऊन कपाशी आणि मका पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच पिण्याचे पाणी, पीक पेरा आणि इतर अडचणींची माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पहाणी दौ-यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड (एरंडोल), संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेताची पाहणी करतांना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून पिठलं, भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून काम करीत आहेत. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पर्यंत तसेच कृषी सहायकापासून ते विभागातील अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत प्रशासनाने सतर्क व तत्पर राहून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना फोन न करण्याच्या सूचना

बँकांकडून अपेक्षेच्या तुलनेत नवीन कर्जवाटप कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवैध सावकारी विरोधात कारवाईचे निर्देश
एरंडोल, यावल आणि रावेर तालुक्यांत अवैध सावकारी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारी विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्यात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button