
जळगाव लाईव्ह न्यूज । बहिणीला घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या भावाने बहिणीवर लोखंडी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथे घडली. या प्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बारकू पवार (रा. महुखेडा तांडा, ता. जामनेर) हा फिर्यादी विशाल सुनील भिल यांच्या बहिणीस चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत होता. यावेळी अश्विनी रवींद्र पवार (वय २४) ही आपल्या भावाला बोलावण्यासाठी खोलीकडे जात होती.
दरम्यान, संतापाच्या भरात आरोपी रवींद्र पवार याने घरातील लोखंडी कुऱ्हाड घेऊन अश्विनी यांच्या मागे धाव घेत त्यांच्या डोक्यात मागून कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अश्विनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी आरोपी रवींद्र बारकू पवार यास तात्काळ अटक केली. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २१५/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०९(१), (२), ३५२, ३५१(२), ११५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.





