शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का!
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तेव्हापासून ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मात्र यातच आता उस्मानाबादमध्ये उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं याचा जिल्ह्यात शिंदे गटाला फायदा होणार आहे. मात्र दुसरीकडे याचा मोठा फटका हा ठाकरे गटाला बसण्याची शक्यात आहे.
ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले देखील उपस्थित होते. निष्ठावान शिवसैनिक अशी खोचरे यांची ओळख आहे. त्यांनी आपला प्रवास शाखाप्रमुखपदापासून सुरू केला होता. त्यानंतर ते जिल्हाप्रमुख झाले. आता ते ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक आमदार, खासदार शिंदे गटात सामील झाले. मात्र खोचरे हे ठाकरे गटासोबतच होते. आता त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटाचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे हे गेल्यावर्षी भाजपमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर ते आता शिंदे गटात सामील झाले आहेत. हेगडे हे काँग्रेसचे आमदार देखील राहिले आहेत. आता त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.