⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | महाराष्ट्र | शिवसेनेचा व्हीप बेकायदेशीर, एकनाथ शिंदेंनी जाहीर केली भरत गोगावले यांची नियुक्ती

शिवसेनेचा व्हीप बेकायदेशीर, एकनाथ शिंदेंनी जाहीर केली भरत गोगावले यांची नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । शिवसेनेत फूट पाडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी खेळली होती. शिंदे यांच्यासोबत सुमारे ४६ आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. बंडखोरांना पुन्हा बोलाविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी एक पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं होते. पत्रकात सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत शिवसेना प्रतोदांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच नवीन प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात राज्यातील जवळपास ४० आमदार सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काहीवेळापूर्वी माहिती देत आमदारांची संख्या आणखी वाढणार असल्याचे म्हटले होते. शिवसेनेकडून बंड मोडून काढण्यासाठी सकाळपासून बैठकांना सुरुवात केली होती. दुपारी शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एक पत्र काढण्यात आले होते. पक्षाकडून सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही, असे त्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले होते. दरम्यान, पत्रानंतर देखील आमदारांनी मुंबईत येण्यास नकार दिला होता.

एकीकडे आमदारांच्या मनात पक्ष कारवाईचा बडगा पुकारणार का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट करीत थेट प्रतोदांचा आदेश आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. शिंदे यांनी तसे पत्र बहुदा राज्यपालांना फॅक्स केले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार : म्हणाले.. यापुढे असेच सहकार्य राहू द्या!

नेमकं काय लिहिलंय पत्रात?

शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय
दि
. 22 जून 2022

प्रति
श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई पाटण विधानसभा
विषय:
शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सूचना
पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. 22 जून, 2022 रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई 400006 येथे सायंकाळी 05.00 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस.एम.एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.
सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

पत्रानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट प्रतोदच बदल केला आहे. काल देखील शिवसेनेने गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करीत अजय चौधरी यांची निवड केली होती. शिंदे यांनी माझ्याकडे जास्त आमदार असून ती निवड अवैध असल्याचे म्हटले होते. आजच्या ट्विटमुळे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे चित्र पाहावयास मिळत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह