जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । गेल्या अनेक दिवसांपासून मनसे-शिवसेना युतीची चर्चा सुरु होती. ठाकरे बंधूची युतीची घोषणा कधी होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर शिवसेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब झाला. उद्या दुपारी १२ वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत युतीची घोषणा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट दिली.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ठाकरे बंधूंचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. या फोटोत ठाकरे बंधूंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. ठाकरे बंधूंचा हा फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी उद्या १२ वाजता ऐवढेच लिहिले आहे. त्यामुळे उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार हे निश्चित झाले आहे.

ठाकरे बंधू एकत्रित येत आगामी महापालिका निवडणुका एकत्रित लढणार आहेत. मनसे-शिवसेना युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा देखील सुरू होत्या. तसंच मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत देखील चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यात असलेला जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक चर्चेनुसार, शिवसेना (UBT) साधारणपणे १४०-१५० जागा लढवेल, तर मनसेच्या वाट्याला ६०-७० जागा येऊ शकतात. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.











