
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडींचा धडाका लावला आहे. बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत महायुतीच्या १२ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
माघारीच्या शेवटच्या दिवशी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागांबाबत समन्वय झाल्याने अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली. शिवसेना शिंदे गटाच्या 6, भाजपच्या 3आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2अशा एकूण ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. याशिवाय आणखी एका जागेवरील बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या खात्यात १२ जागा जमा झाल्या आहेत. मात्र, मुक्ताईनगर मतदारसंघात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या देवयानी देशमुख यांचा अर्ज कायम असल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
नेत्यांच्या घरातील सदस्यांची वर्णी
या निवडणुकीतील बिनविरोध उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता, अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संधी मिळाल्याचे दिसून येते. मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, खासदार उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम, जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांचा बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी पाटील आणि पत्नी मृणाल पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांनाच अधिक संधी मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नऊ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान
जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १२ जागांवर बिनविरोध निवडी झाल्याने उर्वरित नऊ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही मतदारसंघांतील उमेदवारांनी माघार न घेतल्याने या जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
पाहा बिनविरोध जागांवर कोण कोण निवडून आले?
शिवसेना शिंदे गट
मंत्री गुलाबराव पाटील
आमदार चंद्रकांत सोनवणे
सुमित किशोर पाटील
मृणाल अमोल पाटील
नलिनी चिमणराव पाटील
सोमसिंग खुमानसिंग पाटील
भाजप
मंत्री गिरीश महाजन
रोहित निकम
रजनी सावकारे
राष्ट्रवादी अजित पवार गट
सोनल संजय पवार
जयश्री अनिल पाटील





