जळगाव जिल्हा

टीओडी मीटरमुळे जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांची ‘इतक्या’ कोटींची बचत!

साडेचार लाख घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराचा लाभ; दिवसा वीज वापरा अन् मिळवा प्रतियुनिट ८५ पैशांची सवलत

जळगाव लाईव्ह न्यूज । आधुनिक तंत्रज्ञानाच्या टीओडी मीटरमुळे वीजग्राहकांना विजेचा अचूक वापर समजण्यासोबतच त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, दिवसा वीजवापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना महावितरणकडून प्रतियुनिट सवलतही दिली जात आहे. या योजनेअंतर्गत जळगाव परिमंडलातील ४ लाख ४९ हजार ७०७ घरगुती ग्राहकांना आतापर्यंत तब्बल १० कोटी ३ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक असून, ते बसविण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढत आहे. दिवसा सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज तुलनेने स्वस्त उपलब्ध होत असल्याने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने घरगुती ग्राहकांसाठी दिवसा वीजवापरावर सवलत लागू केली आहे. जुलै २०२५ पासून ही सवलत दिली जात आहे. ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) प्रणालीमध्ये वीजवापराच्या वेळेनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकांनंतर प्रथमच घरगुती ग्राहकांनाही या प्रणालीद्वारे स्वस्त दरात वीज वापरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जुलै २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात ही सवलत प्रतियुनिट ८५ पैसे असून, पुढील तीन आर्थिक वर्षांत त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे.

जळगाव परिमंडलातील एकूण ४ लाख ४९ हजार ७०७ घरगुती ग्राहकांना आतापर्यंत १० कोटी ३ लाख रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. यामध्ये जळगाव मंडलातील २ लाख ८९ हजार १५५ ग्राहकांना ६ कोटी ८ लाख रुपये, धुळे मंडलातील १ लाख १ हजार ३९३ ग्राहकांना २ कोटी २८ लाख रुपये, तर नंदुरबार मंडलातील ५९ हजार १५९ ग्राहकांना १ कोटी ६७ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

टीओडी मीटरमुळे वीजमीटरचे रीडिंग स्वयंचलित पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे अचूक वीजबिल मिळण्यास मदत होते. तसेच घरातील तासागणिक वीजवापराची माहिती मोबाईलवर पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीजवापराचे नियोजन आणि नियंत्रण करणे शक्य होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर यांसारख्या अधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर केल्यास ग्राहकांना आर्थिक बचतीचा अधिक लाभ मिळू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे, हे अत्याधुनिक टीओडी मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतर ग्राहकांना वीजबिल मिळणार आहे. हे मीटर महावितरणकडून विनामूल्य बसविण्यात येत असून, ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. मीटर रीडिंगमध्ये मानवी हस्तक्षेपालाही वाव राहणार नाही.

दिवसा वीजवापराची सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्यास सहकार्य करावे. तसेच अधिक वीज वापरणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button