⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावातील शिवसेनेच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । शिवसेना तालुकाप्रमुख विधानसभा क्षेत्र प्रमुख यांच्या विरोधात धादांत खोटे गुन्हे दाखल झाले. मुख्यमंत्री आमचे असताना देखील आमच्यावर ही परिस्थिती आली आहे. अशी खंत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. शिवसेना शिवसंपर्क अभियान अंतर्गत मुक्ताईनगर मध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ही खंत व्यक्त केली. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची या सभेला विशेष उपस्थिती होती.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, गुन्हे दाखल होत असले तरी आम्ही निधड्या छातीचे शिवसैनिक आहोत. जर गुन्हा केला असेल तर निश्चित सांगू. गुन्हा करून लपून राहणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आमची पण वेळ येईल आणि प्रत्येक विषयाला उत्तर देण्यात येईल. केसेसला आम्ही घाबरत नाही. असा टोलाही यावेळी आमदार पाटील यांनी लगावला.

तर दुसरीकडे शिवसंपर्क अभियानाच्या यासभेत जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, गजानन मालपुरे, उत्तम सुरवाडे, गजानन खेकडे, सुनील पाटील, पंकज राणे, अफसर खान, आनंदा पाटील, सुरेश परदेशी आदी प्रमुख व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी भाषण करताना खासदार माने म्हणाले की, जिल्ह्यात ११ पैकी ५ आमदार आहेत आणि लवकरच ११ पैकी ११ आमदार शिवसेनेचे असणार आहे.