⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शास्त्री फार्मसीतर्फे फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली आणि पथनाट्याचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयात “अवर प्लॅनेट अवर हेल्थ” या वर्षाचा फार्मासिस्ट दिनाचे ब्रीदवाक्य होते. कार्यक्रमास एरंडोल नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे, शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व संस्थेच्या सचिव रूपा शास्त्री हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी जागतिक फॉर्मसी दिवस का साजरा करण्यात येतो व फॉर्मसिस्टचे समाजातील योगदान काय आहे याची माहिती दिली. औषध संशोधनापासून ते एका रुग्णाच्या हातात येईपर्यंत फार्मासिस्ट ची महत्वाची भूमिका का आणि कशी असते ते सांगितले.

उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी प्रस्तावना सादर करताना महाविद्यालय विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना देत असल्याची माहिती दिली व फॉर्मसिस्टचे समाजातील कार्य, महत्त्व,औषधी व्यापाराविषयी संकल्पना, इथिकली व्यवसाय कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयामध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२२ यादरम्यान महाविद्यालयात विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतील आणि त्यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि क्वीज घेण्यात येतील आणि या उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक डी.फार्म व बी. फार्म च्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांसाठी मार्गदर्शन करतील अशी त्यांनी माहिती दिली.

नंतर एरंडोल शहरातून भव्य अशी औषध जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे डॉ. प्रशांत पाटील आणि श्री गजानन ठोसर यांनी शहरात पुष्पवर्षाव करून स्वागत केले. रॅलीतुन लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका-चौकात औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, पेशंट काउन्सिंलींग या विषयांवर पथनाट्ये सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा . सुनिल पाटील , प्रा. अजिंक्य जोशी आणि समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.